Ad will apear here
Next
कर्जतचे दिवस...!
रवींद्र गुर्जर यांचे सख्खे/चुलत मामा. उजवीकडून दुसरे भा. द. खेर.

‘सुटीच्या दिवसांत आजोळी किंवा मामाच्या गावाला जाणं, हा त्या काळी नित्यक्रम होता. सन १९५४पर्यंत, म्हणजे मी आठ वर्षांचा होईपर्यंत आम्ही कर्जतला दर वर्षी जायचो. तिथल्या सगळ्या आठवणी, अंधुक का होईना, अजूनही आहेत. ‘बाळपणीचा काळ सुखाचा’ ही जाणीव त्या आठवणी करून देतात...’ ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात आज लिहीत आहेत त्यांच्या बाळपणीच्या सुखद आठवणींबद्दल...
............
नगर जिल्ह्यातलं कर्जत हे छोटंसं गाव म्हणजे आमचं आजोळ. आजोबा गंगाधरपंत खेर हे तिथले प्रख्यात वकील. त्यांचा व्यवसाय धो धो चालायचा. त्या काळात घरी सोनं किलोच्या हिशेबात होतं, असं म्हणतात. प्रख्यात लेखक भा. द. खेर यांचे वडील ती. दत्तात्रय म. खेर हे आजोबांचे सख्खे बंधू. दोन्ही भाऊ एकत्रच राहत होते. घर तसं मोठं होतं. आजोबांना आठ मुलं - पाच मामा, दोन मावश्या आणि एक आमची आई. ‘दमं’ना चार मुलं आणि एक मुलगी. आजी ही आजोबांची दुसरी बायको. बाळंतपणात वा नंतर काही मुलं गेली असल्यास ठाऊक नाही.

ज्येष्ठ खेर बंधूंचं राम-लक्ष्मणासारखं प्रेम होतं. मुलांची शिक्षणं झाली, लग्नं झाली आणि त्यांना पहिली मुलंही झाली, तरी आजोबांनी त्यांना बाहेर कुठे जाऊ दिलं नाही. ‘नोकरी-धंदा पुढे आयुष्यभर करायचा आहे. घाई-गडबड करू नका. शांतपणे इथे राहा,’ असा त्यांचा आदेश होता. चुलत आजोबा पुढे जवळच जामखेड या गावी गेले. तिथे त्यांनी वकिली सुरू केली आणि ती जोरात चालली. आम्हा आते-मावस-चुलत भावा-बहिणींची संख्या मोठी आहे. सख्ख्या भावंडांप्रमाणे आमचं प्रेम अजूनही टिकून आहे. आमच्या नियमितपणे गाठीभेटी सुरू असतात. नाहीतर आता दिवस असे आले आहेत, की फक्त लग्नकार्य आणि वैकुंठातच नातलग एकत्र येतात.

आज्या आणि मावश्या.

मामांपैकी सगळ्यात थोरला नाना मामा. त्यानं कर्जतमध्येच वकिली सुरू केली. दुसरा अण्णा मामा. त्यानं नगरला जाऊन वकिलीच चालू केली. तिसरा दादा मामा डॉक्टर होता. काही दिवस सरकारी नोकरी करून त्यानं पुण्यात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. चौथा अप्पा मामा, सब-रजिस्ट्रार झाला. पाचव्या माधवमामानं शेतकीची पदवी घेऊन, त्याच खात्यात सरकारी नोकरी पत्करली. थोरली अक्का मावशी आंबर्डेकर बनून, मनमाडला गेली. तिचे यजमान डॉक्टर होते. धाकटी कुसुम मावशी लग्नानंतर पुण्यात आली. तिचे यजमान आडिवरेकर पोस्ट खात्यात होते; आणि आमची आई! तीही पुण्यातच आली. आमचे वडील वसंतराव गुर्जर आधी मोत्याचे व्यापारी होते. पुढे करसल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.

हाच तो आड.
सुटीच्या दिवसांत आजोळी किंवा मामाच्या गावाला जाणं, हा त्या काळी नित्यक्रम होता. सन १९५४पर्यंत, म्हणजे मी आठ वर्षांचा होईपर्यंत आम्ही कर्जतला दर वर्षी जायचो. तिथल्या सगळ्या आठवणी, अंधुक का होईना, अजूनही आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर छोटं अंगण, मग ओसरी, त्याच्या डाव्या बाजूला एक खोली, पुढे तीन-चार खोल्या. मागच्या बाजूला मोकळी जागा आणि तिथेच संडास. घराच्या डावीकडे एक आड होता. घरची शेती होती. धान्याची पोती ठेवण्यासाठी दोन-तीन खोल्या नव्यानं बांधल्या होत्या. तिथं गेलं, की तांदूळ-ज्वारीचा वास यायचा. घरात वीज नव्हतीच. संध्याकाळी कंदील लावायचे. पाहुणे आणि पक्षकारांची ये-जा भरपूर. चहा-पाणी आणि जेवायला रोज बरेच लोक असत.

आडाचे जन्मवर्ष अण्णा मामाने कोरले होते.आडाची एक आठवण अशी : सन १९३३मध्ये तो आड बांधण्यात आला. नगर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून प्रसिद्ध! १९५२-५३ दरम्यान मोठाच दुष्काळ पडला. आडातील पाण्यानं तळ गाठला, म्हणून त्याची खोली वाढवण्याचं ठरलं. त्यासाठी आत - विहिरीत सुरुंग लावण्यात आले. ते पेटवल्यावर आतून मोठमोठे दगड उंच उडून लांबवर फेकले जातात. मी त्या वेळी तिथेच होतो. सर्व मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा पार लांब, आतल्या खोल्यांमध्ये, दारं-खिडक्या बंद करून ठेवलेलं होतं. खरोखरच, दगड छतावर, बाजूच्या भिंतींवर जाऊन पडत होते. बराच वेळ सामसूम झाल्यावरच आमची सुटका झाली. 

गावाचे रस्ते लहान, धुळीनं भरलेले. घराजवळच एक मारुती मंदिर होतं. थोड्या पायऱ्या चढून वर जायला लागायचं, ते अजूनही लक्षात आहे. गावात नदी होती; पण तिला फार पाणी नसायचं. कधी कधी मामा किंवा आजोबांबरोबर शेताकडे जायचो. तिथे आंबा, पेरू अशी फळझाडं होती. मामा मंडळी संध्याकाळी बॅडमिंटन खेळायला जात. आजोबांचा धाक होता; पण मी लहान असल्यामुळे मला भीती नव्हती. एकदा भिंतीला टेकून उभी असलेली सायकल ओढल्यामुळे माझ्या अंगावर पडली आणि डोक्याला खोक पडली होती. दिवाळीच्या दिवसांत फटाके, भुईनळे आणले जात. एका छोट्या खोलीत ते ठेवलेले असत. माझ्यापेक्षा मोठे भाऊ मला तिथे जाऊन, त्यातल्या काही गोष्टी चोरून आणायला सांगत. मी पण हळूच जाऊन आणायचो. मामांची, मावश्यांची मुलं एकत्र असल्यामुळे खूप मजा यायची. आठवणी कमी असल्या, तरी आहेत त्या पक्क्या आहेत. (गुर्जर यांनी सांगितलेल्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणींचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

त्या काळी आईचं आणि लेक-सुनेचं बाळंतपण एकाच वेळी असणं, ही गोष्ट फार नवलाची नव्हती. आमचे मामा खूप शिकले, तरी मुलींनी जास्त शिकण्याची प्रथा नव्हती. आई चौथीपर्यंत शिकू शकली; पण तिला शिक्षणाबद्दल विलक्षण प्रेम होतं. शाळा नसली, तरी थोरल्या भावांकडून (मामांकडून) ती संस्कृत सुभाषितं, गणित आणि इंग्रजी शिकायची. तेही मोठ्या कौतुकानं तिचा अभ्यास घ्यायचे. तर्खडकर (इंग्रजी-मराठी) भाषांतरपाठमालेचे तीन भाग तिनं आत्मसात केले होते. अभिमन्यूला आईच्या पोटात असताना श्रीकृष्णाकडून ‘चक्रव्यूहा’त कसं शिरायचं हे ज्ञान मिळालं होतं. माझ्या आईनं लग्नापूर्वीच घेतलेलं, रक्तात भिनलेलं इंग्रजीचं शिक्षण पुढे मला उपयोगी पडून मी एक (चांगला) अनुवादक झालो. विलक्षण गोष्ट आहे ना! पुढे आई लग्नानंतर आम्ही लहान मुलं असतानाही हिंदीच्या परीक्षा देत राहिली आणि ‘कोविद’ झाली. तिच्या या शिक्षण प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे आमच्या एकाच गुर्जर कुटुंबात पाच पीएचडी, दोन एम. फिल., बहुतेक द्विपदवीधर, इंजिनीअर होऊन लेखन, प्रकाशन, शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करत आहेत.

चुलत आजोबा द. म. खेर१९५४ नंतर कर्जतवाऱ्या बंद झाल्या. कारण आमचे आजोबा-तात्या आजारी पडले आणि त्यांना उपचारांसाठी पुण्यात आणलं. त्या वेळी त्यांनी नव्वदी गाठलेली होती. खेर कुटुंबीय बहुतांशी दीर्घायुषी होते. आजोबा सदाशिव पेठेतील आमच्या घरी राहत होते. आपण मुलीकडे राहतो, ही गोष्ट त्यांना आवडण्यासारखी नसल्यानं, ते घर धाकट्या मामाचं आहे, असं त्यांना सांगितलेलं होतं. वृद्धपण हाच त्यांचा आजार होता. थोड्याच दिवसांत त्यांचं निधन झालं. आजी पुढे बरीच वर्षं जगली. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्तानं कर्जतहून मामा मंडळी पुणे व अन्यत्र गेली. फक्त थोरला नानामामा (वकील) कर्जतमध्ये राहिला. त्याची मुलंही पुण्यात आली होती. अर्थात सुट्टीसाठी आम्हा मुलांना कर्जतला जाण्याचा प्रश्नच आला नाही. बाहेर पडलेले मामा मात्र अधूनमधून तिकडे जात. पुढे नानामामाही वकिली बंद करून पुण्याला आला. कर्जतच्या घराची व्यवस्था तिथल्याच एका जवळच्या व्यक्तीकडे सोपवण्यात आली. आमची आई आजोळच्या मारुतीला अभिषेक करण्यासाठी पुढे अनेक वर्षं पैसे पाठवत होती.

कर्जत गावाची हळूहळू सुधारणा होत गेली. घराकडे लक्ष देणं अवघड झाल्यामुळे ‘खेर निवास’ विकण्यात आला. त्याचं पुढे नूतनीकरण झालं. खेरांपैकी कोणीही तिथे गेलं, तर त्यांचं स्वागत तिथे होत असे. आजूबाजूला राहणाऱ्या हिंदू-मुस्लिम कुटुंबीयांशी अगदी घनिष्ट नातं होतं. त्यात वकील, डॉक्टर, सरकारी नोकर, व्यावसायिक होते. त्यांची मुलंही नगर, पुणे, मुंबई आणि अन्यत्र पांगली. त्यांच्यापैकी कोणीही भेटलं, तरी आमच्या बंधू-भगिनींना खूप आनंद होतो. आजोबांच्या लौकिकामुळे ते असताना, अनेक प्रसिद्ध नेते, कलाकार, संघाचे प्रचारक आणि पदाधिकारी नियमितपणे घरी येत असत. सुधीर फडके, गंगाधर महांबरे, राम फाटक आणि त्या काळातील लेखक मंडळी. भा. द. खेरांनी कर्जतमधूनच लेखनाला सुरुवात केली होती. त्यांचे मित्र घरी येत. त्या काळात ‘केसरी’ आठवड्यातून एकदा निघत असे. तो नियमितपणे घरी येई. अन्य मासिके, नियतकालिके कोणी घेऊन येई. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा चाले.

नगर जिल्ह्याच्या दक्षिणेला कर्जत तालुका.भा. द. खेर पुढे पुण्याला ‘केसरी’त रुजू झाले. ते सहसंपादक पदापर्यंत जाऊन पोहोचले. त्यांचा मुलगा राजेंद्र खेर लेखन-प्रकाशन व्यवसायात चांगलाच स्थिरावला आहे. मीही थोडंफार काम साहित्यक्षेत्रात करत आहे. खेरांचा वंशवृक्ष खूपच फोफावला आहे. मामा-मावश्या (मातोश्री) देवाघरी गेल्या. आमच्यातील सगळ्यात थोरला (मामे) भाऊ नीलकंठ खेर (तात्यांचा नातू) नुकताच ८६ वर्षांचा झाला. पुण्यातच आम्ही १६-१७ भाऊ-भाऊ आहोत. बहिणी वेगळ्या. सुमारे १५ वर्षं, दरमहा सर्वांनी एका भावाकडे एक दिवस सहकुटुंब (श्री. व सौ.) जमायचं, असा नित्यक्रम चालू होता. वाढत्या वयाबरोबर तो उत्साह ओसरला. तरी वर्षात एकदा तरी आमचं स्नेहसंमेलन होत असतं. आता एक-एक जण निखळायला लागला आहे.

कर्जतला एक दिवसाची सहल काढावी, असा संकल्प दर वेळी होत असतो. सगळ्यांकडे गाड्या आहेत. कधी उजाडणार तो दिवस?

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZYYBS
Similar Posts
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
माझं घर ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत, लहानपणापासून आजतागायत त्यांचं ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य झालं, त्या घरांबद्दल...
माझे ‘नाट्य-चित्र’मय जग ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज लिहीत आहेत नाटक आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाबद्दलच्या आठवणी...
यशस्वी चित्रपटांचे निकष ‘पटकथा लेखनाचा अभ्यास करताना मी गेल्या ८० वर्षांतल्या गाजलेल्या आणि मी पाहिलेल्या सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language